विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे.
विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत. तर त्यानंतर ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये 133 सहाय्यकारी मतदान केंद्रे असतील. मुंबई उपनगर मध्ये 100 तर पालघरमध्ये 73 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत.
साधारणपणे 1400 मतदारांमागे एक मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांचीही वाढ करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी यापूर्वी 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने 1 हजार 188 मतदान केंद्रे राज्यभरात वाढविण्यात आली आहेत.
मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post