पोलिसांना धक्काबुक्की करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचे पलायन


एएमसी मिरर : नगर
गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त शहरातून हद्दपार करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान यांनी मुकुंदनगर परिसरात पोलिसांना धक्काबुक्की करुन पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.9) सायंकाळी घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस व जिल्हा प्रशासनाने मोहरम व गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना गणेश विसर्जन मिरवणूक होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहेत. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान यांनाही हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपार असतांनाही समद खान हे सोमवारी सायंकाळी मुकुंदनगर परिसरात वावरताना पोलिसांना आढळून आले. त्यामुळे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. समद खान यांचा पाठलाग करुन त्यांना पकण्यात आल्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करुन त्यांनी पलायन केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अजय नगरे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक खान यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नगरसेवक खान यांच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post