पश्चिम महाराष्ट्रातील तीन साखर कारखान्यांच्या जप्तीचे आदेश


एएमसी मिरर : वेब न्यूज
एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. ग्रीन पॉवर शुगर्स, शरयू अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना या तीन कारखान्यांनी एकूण २३ कोटी ५९ लाख रुपये थकविल्याचे असल्याचे वृत्त आहे.
खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड या कारखान्याने सन २०१८-१९ च्या हंगामातील गाळप उसाचे थकीत एफआरपी ५ कोटी २ लाख ११ हजार रुपये थकीत आहेत. फलटण तालुक्यातील शरयु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने सन २०१८- १९ च्या हंगामातील गाळप उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम १६ कोटी २३ लाख ७१ हजार रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी आहे. पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-१९ च्या हंगामातील गाळप उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम २ कोटी ३३ लाख ५९  हजार रुपये शेतकर्‍यांचे थकीत ठेवली आहे.
थकीत एफआरपीची रक्कम आणि त्यावर १५ टक्के दराने होणारे व्याज या रक्कमा कारखान्यांकडून जमीन महसूलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहीत पध्दतीने विक्री करुन या रक्कमेतून ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील तरतुदीनुसार देयबाकी रक्कमेची खात्री करुन संबंधितांना विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह देण्यासाठी सातारा जिल्हाधिकार्‍यांना कारवाई करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post