'ईडी'च्या चौकशीमुळे राज ठाकरेंची बोलती बंद : अजित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आल्यापासून ते बोलायचेच कमी झालेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. बारामती मधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
22 ऑगस्टला राज ठाकरे यांची कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज यांची साडेआठ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. यावेळी ईडीच्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरं दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही", अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. मात्र, ही चौकशी करण्यात आल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झाल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे कॉंग्रेस आघाडी ऐवजी वंचितबरोबर लढणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी चौकशीनंतर राज ठाकरेंची बोलती बंद झाल्याचे म्हणत त्यांना डिवचले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post