अजित पवारांचे लोकेशन सापडले; शरद पवार काढणार समजूत


एएमसी मिरर : वेब न्यूज
घाणेरड्या राजकारणाने कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अखेर शोध लागला आहे. त्यांचे योग्य लोकेशन कळल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. ही वार्ता मिळताच शरद पवार हे त्यांची समजूत काढण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मोबाईल स्वीच ऑफ लागत होता. यामुळे ते नेमके कुठे आहेत याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. खुद्द शरद पवारांचीही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. यामुळे साऱ्यांनाच अजितदादा कुठे आहेत याची उत्सुकता होती. अजित पवारांचे लोकेशन अखेर समजले आहे. यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री उशिराने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
पवार यांचे भागीदार असलेले वीरधवल जगदाळे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. दिवसभराच्या घडामोडीनंतर पवार हे नॉटरिचेबल होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही अजित पवार यांनी संपर्क केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीच पवार यांनी आपला राजीनामा हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवून दिला होता. शुक्रवारी सकाळी बागडे यांना दूरध्वनी करून याबाबत त्यांनी कल्पना दिली. दुपारी अजित पवार हे बारामती व पुणे परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर आले.
अजित पवार हे राज्य बँकेचे अध्यक्ष होते. या बँकेतील अनियमिततेमुळे शरद पवार यांच्यावर वयाच्या ८० व्या वर्षी ईडीने गुन्हा दाखल केला. यामुळे व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात आली आहे. आपले नेहमीचे वाहन बदलून ते या कारखान्यावर आल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच शरद पवारही बारामतीकडे निघाले असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post