अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा; विधानसभा अध्यक्षांकडून मंजूर


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आजचे राजकारण त्याच मुद्यावर फिरताना दिसून आले. त्यानंतर आज सायंकाळी एक नाट्यमय घडामोड घडलेली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ई-मेलच्या माध्यमातून तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती खुद्द हरिभाऊ बागडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा दिला. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले होते. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे निघून गेले; पण अजित पवार मागेच राहिले आणि त्यांनी  बराच वेळ चर्चा केली होती.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेकदा मतभेत समोर आले. ईव्हीएमच्या मुद्यावर दोघांमध्ये सर्वांत  मोठा मतभेद समोर आला होता. यानंतर केंद्र सरकारने कलम ३७० काढल्यानंतर पवारांनी त्याचा विरोध केला होता, तर अजित पवारांनी समर्थन केलं होतं. अजित पवारांवर सहकारी बँक घोटाळाप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झालाय, सुप्रीम कोर्टानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, अजित पवार हे आज शरद पवार यांच्या ईडीविरोधातील भूमिकेवेळीही कुठेच दिसून आले नाहीत. यावरून चर्चा झडू लागल्यानंतर मुंडे यांनी ते पुण्यात असल्याचे सांगितले होते. तसेच ट्रॅफिकमुळे ते येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. मात्र राजीनामा देण्याचं कारण गुलदस्त्यात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post