एएमसी मिरर : वेब न्यूज
युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसात जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात बोलताना दिली.
महाजन पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची काल चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक राहिली. येत्या २ दिवसात युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.
युतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या काळातच ठरला आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी कदम यांचे वक्तव्य निरर्थक असल्याचे म्हटले आहे. युतीत मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप काय निर्णय झालाय, याची आपल्याला माहिती नाही. पण याबाबतचा निर्णय देखील अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे सांगत महाजन यांनी कदम यांचा दावा खोडून काढला.
मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपत येण्यास उत्सुक आहेत. पण आम्हालाही काही मर्यादा आहेत. आमच्याकडेही निष्ठावंत नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांना डावलून चालणार नाही. शिवाय दुसर्या पक्षातील नेत्याला आपल्याकडे घेतले तरच आपले उमेदवार निवडून येतील, अशी परिस्थिती आता भाजपची राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही मेगा भरतीबाबत काही बंधने घालून घेतली आहेत. पण भाजपत येण्यासाठी वेटींग लिस्टवर असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. मेगा भरतीचा दुसरा टप्पा १० सप्टेंबरनंतर होणार आहे, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दोघांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. कारण ते त्यांच्या संपर्कात आहेत, असे महाजन यांनी सांगितले.
रिपाइंची १० जागांची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपा-शिवसेना १८ जागा सोडणार आहेत. या १८ जागांपैकी रिपाइंला १० जागा देण्यात याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
चर्चेचा पहिला टप्पा पार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप-शिवसेना २७० जागा तर घटक पक्ष १८ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप १६०, शिवसेना ११० आणि घटक पक्ष १८ जागा लढतील.
फडणवीस, नड्डा, ठाकरेंमध्ये होणार चर्चा
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा काल पार पडली आहे. मात्र शिवसेना-भाजप जागावाटपासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात चर्चा होणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या प्राथमिक चर्चेत कोणत्या जागेवर कोण लढणार? आणि किती जागांवर लढणार? याबाबत चर्चा झाली. मात्र युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत आता चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत ही बैठक होणार आहे.
Post a Comment