एएमसी मिरर : वेब न्यूज
देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा झाली पाहिजे, असा आग्रह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी धरला होता. याचं कारण हेच होतं की परकिय भाषाचं आक्रमण आपल्या भाषांवर होऊ नये, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक देश एक भाषेचा नारा दिला आहे. हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “एक देश एक भाषेचा नारा केंद्रीय गृहमंत्री देत आहेत. हिंदी ही काही देशातल्या प्रत्येक नागरिकाची मातृभाषा नाही. एका देशात अनेक मातृभाषा असलेले लोक राहतात. या विविधतेचा सन्मान तुम्ही करणार नाही का? अनुच्छेद २९ नुसार प्रत्येक भारतीय माणसाला त्याची भाषा आणि संस्कृती निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र अमित शाह यांनी केलेले वक्तव्य हे सांप्रदायिक आहे” असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेसंदर्भातलं एक ट्विट केलं आहे. “हिंदी दिवसाच्या देशवासीयांना शुभेच्छा. आपल्या देशात अनेक भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांचा सन्मान योग्य रितीने झाला पाहिजे. आपण जरी नव्या भाषा शिकलो तरीही आपल्याला आपली मातृभाषा कधीही विसरता कामा नये ” असं ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
डीएमकेचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “हिंदी भाषा आमच्यावर का थोपवली जाते आहे? अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो. त्यांचं वक्तव्य आघात करणारं आहे. देशाच्या एकतेत बाधा आणणारं आहे. त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं” अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे.
Post a Comment