'विरोधी पक्षांचे नेते जेलमध्ये, नाहीतर चौकशीच्या फेऱ्यात'


एएमसी मिरर : वेब न्यूज  
विरोधी पक्षांमधले नेते एकतर जेलमध्ये नाहीतर चौकशीच्या घेऱ्यात. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संगीत खुर्ची केली. आपण पाच वर्षे भक्कम मुख्यमंत्री दिला. तुम्ही राष्ट्रभक्तांबरोबर काम करत आहात हे तुमचे भाग्य आहे, असे सांगत लोक आपले ऐकत आहेत. त्यांना सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार आणण्याचे आवाहन त्यांना करा, असा आदेश भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा सोमवारी (ता. 23) पुण्यात झाला. त्यांच्यासमोर नड्डा बोलत होते. राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश, राज्यमंत्री संजय भेगडे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, अमर साबळे तसेच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विधानसभेच्या प्रचाराचे शिंग फुंकताना नड्डा यांनी ३७० कलम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती केली.
देशात 2 हजार 300 राजकीय पक्ष आहेत. त्यात 59 प्रादेशिक आणि 7 राष्ट्रीय आहेत. या गर्दीत फक्त भाजपा प्रजातांत्रिक पक्ष आहे. बाकी सगळे पक्ष पारिवारिक, चाचा-भतिजा पार्टी आहेत. भाजप खऱ्या अर्थाने लोकशाही पक्ष आहे. या पक्षात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरलेला आहे, असे नड्डा म्हणाले.
त्यांनी सांगितले, की कलम 370 मुळे काश्मिरात अनेक समस्या होत्या. त्या दूर केल्या जात नव्हत्या. मोदी व शहा यांनी इच्छाशक्ती दाखवली. राज्यसभेत बहुमत नसतानाही तिथे भाजपाच्या सदस्यसंख्येपेक्षा जास्त मतांनी हा विषय मंजूर झाला. ही रणनीती त्या दोघांची होती. आता काश्मिर व देश एक झाला. मुलींना राज्याबाहेर लग्न केले तरीही वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, अनुसुचित जातींना लोकसभा, विधानसभेत संधी असे अनेक फायदे होणार आहेत. कोणीही जे धाडस दाखवले नाही ते मोदी व शहा यांनी दाखवले. जगात आर्थिक मंदी असताना मोदींनी 1 लाख 45 हजार कोटी रूपयांच्या सवलती करामध्ये जाहीर केली. आता हा पैसा खरेदीसाठी म्हणून बाजारात येईल. असा निर्णय फक्त मोदीच घेऊ शकतात. अशा राष्ट्रभक्तांबरोबर तुम्ही काम करत आहात, म्हणूनच हे सरकार परत आणायचे आहे, त्यासाठी पक्ष सांगेल ते काम प्रामाणिकपणे करा असे आवाहन नड्डा यांनी केले. बूथवरील एकही मत बाहेर जाणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना व्ही. सतिश यांनी केली.

संगीत खुर्चीची प्रतिमा बदलली
देशाची प्रतिमा नरेंद्र मोदींनी वाढवली तशी देवेंद्रानी महाराष्ट्राची प्रतिमा वाढवली. त्यांच्या नेतृत्त्वाने महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले. मुख्यमंत्रीपदासाठी चालणारी संगीत खुर्ची चालणारे राज्य अशी प्रतिमा यापुर्वीच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची करुन ठेवली होती. ती भाजपने बदलली, असे नड्डा म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post