नगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री?


एएमसी मिरर : नगर 
विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्यास सुमारे ३० विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याची चर्चा आहे. यात नगर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा सुरु आहे.
युती झाल्यास जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ पैकी ७ जागा भाजप तर ५ जागा शिवसेना लढविणार, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासह विद्यमान आमदारांपैकी दोन जणांच्या उमेदवारीवर गंडांतर येणार असल्याचीही चर्चा आहे. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, शेवगावच्या आमदार मोनिका राजळे या चौघांचीही नावे यामुळे चर्चेत आली आहेत. चौघांपैकी दोन आमदारांचे तिकीट कापले जाणार, यावरून भाजप वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कोपरगाव, राहुरी, नेवासे, शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेड या पाच जागांवर भाजपने विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अकोले, नगर शहर व श्रीगोंदा या तीन जागांवर व कॉंग्रेसने शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर या तीन जागांवर वर्चस्व मिळविले. शिवसेनेला मात्र पारनेरची एकच जागा मिळविता आली. सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे व वैभव पिचड हे दोन आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तर भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत गेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post