पोस्टाची कार्डलेस एटीएम सेवा; देशात १.३६ लाख पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा


एएमसी मिरर : वेब न्यूज
देशातील तांत्रिक क्रांतीने ई-मेल, वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर यामुळे डबघाईस आलेले पोस्ट खाते आपला नफा वाढविण्यासाठी नव नवीन शक्कल लढवत आहे. पोस्टाने आता एटीएमकार्ड शिवायही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ही सोय डाक विभागाने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे पैसे काढताना कुठल्याही एटीएम कार्डची गरज नाही. फक्त आधार नंबर सांगितल्यावर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोस्टाच्या कार्यालयात सांगितल्यास १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. हे सुविधा देशात कुठल्याही शहरात ग्राहकांना घेता येणार असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.
बँकिंग क्षेत्रात डाक विभागाने प्रथमच क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने आधार सक्षम भुगतान प्रणाली (एईपीएस) सेवा सुरू केली आहे. नागपूर शहरात ६५ पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ८,४८,०२१ खाती उघडण्यात आली आहे तर नागपूर क्षेत्रात ८६,०५७ खाती उघडली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेंतर्गत १ लाखावर खाती उघडल्याचेही जायभाये म्हणाले.
ही सेवा ग्रामीण जनतेसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच शहरातही एटीएमचा दुरुपयोग होण्यापासून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. डाक विभागाने सुरू केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) एक वर्ष पूर्ण झाले आहेत. देशभरातील १,३६,००० पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत पोस्टाने १ कोटीपेक्षा जास्त खाती उघडली आहे. यासाठी २ लाखाच्या जवळपास पोस्टमनला घरोघरी जाऊन बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण उपलब्ध करून दिले आहे.
शिष्यवृत्ती, मनरेगामध्ये खाते उघडण्यासाठी डाक विभागाकडून महाविद्यालय व गावांमध्ये शिबिर लावण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून चेकबुक, मोबाईल मनी ट्रान्सफर, स्वीप इन स्वीप आऊट, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, रिटेल बिल पेमेंट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जायभाये यांनी सांगितले.
यावेळी वरिष्ठ शाखा प्रबंधक अभिजित जिभकाटे, संचालक पवनकुमार डालमिया, अधीक्षक टी.ए.व्ही शर्मा, सहा. संचालक शशीन राय उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post