चीन संपूर्ण जगासाठी धोकादायक : ट्रम्प


एएमसी मिरर : वेब न्यूज
चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली असून चीन आता जगासाठी धोकादायक होत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेची बौद्धिक संपदा चीनकडून चोरी केली जात असताना अमेरिकेच्या आधीच्या राजकारण्यांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच आज चीनने त्यांचे लष्करी सामर्थ्य वाढवल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने त्यांच्या लष्करावरील खर्च सात टक्क्याने वाढवून १५२ अब्ज डॉलरवर नेला आहे. समुद्रातील अमेरिकेची ताकद रोखण्यासाठीच चीनची ही उठाठेव सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्ला चढवला आहे. माझ्या आधीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी चीनला दरवर्षी ५०० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक रक्कम घेण्याची परवानगी दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या पैशावरच चीनची ताकद वाढली असल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि अधिकाऱ्यांचा वापर करण्याची माजी राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिली होती. पण मी असे काही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी मार्चमध्ये ट्रम्प यांनी चीनच्या मालावरील आयातशुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर चीननेही अमेरिकेच्या मालावरील आयातशुल्क वाढवले होते. या पार्श्वभूमीवर चीनसोबत २०२० च्या निवडणुकीपूर्वी व्यापार करार करण्याची गरज नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी चीनसोबत व्यापारी करार करण्याची गरज नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. चीनसोबत पक्षपती नाही, तर परिपूर्ण करार करण्यावर आपला भर असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post