सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली नाही : मुख्यमंत्री


एएमसी मिरर : वेब न्यूज 
सरकारने कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली नसून या कारवाईत कोणतेही राजकारण झालेले नाही. ईडीकडून करण्यात येत असलेल्या शिखर बँक घोटाळ्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ईडीने शिखर बँक घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावर व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले. मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घोटाळ्यात कुणाची काय भूमिका आहे याची चौकशी सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा असेल तर ईडी त्याचा तपास करते. त्यात राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे सांगतानाच या प्रकरणात कोणतेही राजकारण झालेले नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे जिंकणारा पक्ष कधीही असले राजकारण करत नाही. हे राजकारण ज्यांना कळते त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे आम्हाला असे हातखंडे वापरण्याची गरज नाही. जे काही होईल ते नियमानेच होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर निवडणुका आणि ईडीची कारवाई हा निव्वळ योगायोग असल्याचे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post