एएमसी मिरर : संगमनेर
पंचवीस वर्षे सत्तेची फळे चाखणार्यांनी आपल्या कार्यकाळात जो विकास केला नाही, तो आम्ही केवळ पाच वर्षांत केला आहे. आमची विकासकामे जनतेला भावली आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता पंचवीस वर्षे तरी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना संगमनेरच्या जाहीर सभेत लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाजनादेश यात्रेचे संगमनेर येथे आगमन झाल्यानंतर जाणता राजा मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाच वर्षांत युती शासनाने जी कामे केली आहेत, या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकर्यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत केली असून, भविष्यातही मदत सुरूच राहणार आहे. कोकणचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळवून महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा युती सरकारचा मानस आहे.
प्रत्येक गरिबाला घर मिळावे, हा आमचा अजेंडा आहे. यादीत नोंद झालेल्या सर्व गरिबांना घरे मिळालेली आहेत. सन 2022 पर्यंत एकही जण बेघर राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. चूलमुक्त महाराष्ट्र हे सरकारचे ध्येय आहे. यासाठी घराघरात गॅस कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातही सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने इंग्रजी शाळेतील एक लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेला आहे. शिक्षण क्षेत्रात भारतात महाराष्ट्र तिसर्या स्थानावर आहे. आगामी पाच वर्षांत त्याचा प्रथम क्रमांक राहील. आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्र सहावा, तर उद्योग क्षेत्रात पहिला क्रमांक आहे.
दोष ‘ईव्हीएम’मध्ये नव्हे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खोपडीत
‘ईव्हीएम’मुळे लोकसभेला भाजपला सत्ता मिळाली असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु, त्यांचा हा आरोप साफ चुकीचा आहे. प्रत्येकाच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी बसली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय जनतेला रुचले आहेत. त्यामुळेच त्यांनी मोदींच्या हातात सत्तेच्या चाव्या बहाल केल्या आहेत, असे सांगूूून ‘ईव्हीएम’मध्ये दोष नसून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खोपडीतच खरा दोष असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कामासाठी युती सरकारने बाराशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे धरण व कालव्यांच्या कामाला गती मिळाली आहे. पुढील दीड वर्षात हे काम मार्गी लागणार आहे. निळवंडे लाभ क्षेत्रात येणार्या पाच तालुक्यांतील 180 गावांना याचा फायदा मिळणार आहे. बंद करण्यात आलेल्या अनेक सिंचन योजना आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत. याचा लाभ शेतकर्यांना होत आहे.
आताचा भारत मजबूर नव्हे, तर मजबूत भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देश बदलत आहे. भारताकडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. वाकडी नजर करणार्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले जाते. आता मजबूर नाही, तर मजबूत भारत बनत आहे. मोदींच्या निर्णयामुळे आज सत्तर वर्षांनंतर काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला आहे. वैभवशाली महाराष्ट्रासाठी आपला आशीर्वाद असावा, असे आवाहन शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Post a Comment