जातीवाचक टोमण्यांना कंटाळून दलित अधिकाऱ्याची आत्महत्या


एएमसी मिरर : वेब न्यूज

उत्तर प्रदेशात एका दलित अधिकाऱ्याने जातीवाचक टीकेला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लखिमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री त्रिवेंद्र कुमार गौतम यांनी आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. एका वर्षापुर्वीच त्यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून कुंभी ब्लॉक येथे नियुक्ती करण्यात आली होती.
त्रिवेंद्र कुमार गौतम यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्थानिक नेते आणि संघटनेच्या पुढाऱ्यांमुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी एका शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष, रसूलपूरचा सरपंच आणि एका सरपंचाच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे.
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सार्वजनिक सभेत सर्वांसमोर त्रिवेंद्र कुमार गौतम यांचा अपमान कऱण्यात आला. या व्हिडीओत स्टेजवर बोलणारी व्यक्ती त्रिवेंद्र कुमार गौतम यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कामचोर असल्याचं म्हणत आहे. इतकंच नाही तर अशा अधिकाऱ्यांना बुटांनी मारुन हाकललं पाहिजे असंही म्हणताना ऐकू येत आहे.
सुसाईड नोटमध्ये त्रिवेंद्र कुमार गौतम यांनी आपला वारंवार अपमान आणि मानसिक छळ करण्यात आल्याचं लिहिलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वारंवार आपल्याला लक्ष्य करत अपमान करत आल्याचंही त्यांनी चिठ्ठीत सांगितलं आहे. आपण अपयशी ठरलो असल्याचं सांगताना आपल्या मृत्यूसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि सरपंचाला जबाबदार ठरवत शिक्षा दिली जावी असं त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तपास सुरु असून जबाबदार असणाऱ्या एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post