'देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील'


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील आयआयटी, आयआयएम मधील युवकांना एकत्रित करित कार्यान्वित केलेली ‘वॉर रूम’, शासकीय अधिका-यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’ सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमांमधून सेलिब्रिटींना सोबत घेत होत असलेली ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्रा’कडील वाटचाल आणि पक्षाअंतर्गत व बाहेरील राजकीय विरोधातून यशस्वीपणे काढलेली वाट या बाबी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत राज्यात झालेल्या इतर मुख्यमंत्र्यांपासून वेगळे बनवितात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील,” असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने फर्गसन महाविद्यालयातील अम्फी थिएटर येथे आयोजित एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘गेन इनसाईट इनटू द लीडरशीप स्टाईल अँड डेव्हलपमेंट व्हिजन ऑफ महाराष्ट्राज् चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस’ अर्थात ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ हा या चर्चासत्राचा विषय होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात संपूर्ण कालावधी पदावर राहून राज्यकारभार करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. अनेक अडचणी, ताणतणाव, आंदोलने, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक संकटांना तोंड देत फडणवीसांनी केलेला यशस्वी राज्यकारभार हा व्यवस्थापनशास्त्राचा विषय असून याच विषयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसमोर देवेंद्र फडणवीस हे एक ‘केस स्टडी’ म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रीन’ या पुस्तीकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सौरभ राव यांबरोबरच कॉरपोरेट चाणक्य व व्यस्थापन गुरु डॉ. राधाक्रिष्ण पिल्लई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक मयुरेश दिडोलकर, आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तीमत्त्व आणि नेतृत्त्वशैलीवर आपली टिपणे दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग हे यावेळी उपस्थित होते.
श्वेता शालिनी म्हणाल्या ,“सामान्य नागरिकांपर्यंत सरकार पोहोचावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ आयडीया काढल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर ‘मुख्य सेवक’ म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. गेल्या पाच वर्षांत नागरीकांनी ही बाब अनुभविली आहे. एखादा उपक्रम करायचा असेल तर त्याचे बाह्यरूप नाही तर त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. हाच विचार देवेंद्र फडणवीस देताना दिसत आहेत.”
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील का या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता शालिनी म्हणाल्या की, फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची नको आहे, मात्र आज राज्याला त्यांच्या सारख्या मुख्यसेवकाची मात्र निश्चित गरज आहे.
ही बातमी पण वाचा : मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
‘मिशन मोड डिलिव्हरी’ या विषयावर आपले मत मांडताना सौरभ राव म्हणाले, “कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आरटीआय (माहितीचा अधिकार) आणि राईट टू सर्व्हिस (सेवेचा अधिकार) यांचे महत्त्व देवेंद्र फडणवीस यांना समजले असून या दोहोंचा समन्वय साधत ते कार्यक्षमपणे काम करीत आहेत. एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असून राज्यात व्यवसाय वाढावेत या दृष्टीने ‘लायसन्स राज’ संपविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा आवर्जून नमूद करण्यासारखाच आहे. या उपक्रमामुळे आधी लागणा-या ७६ परवानग्या आता केवळ २५ वर आल्याने त्याचा फायदाही दिसून येत आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत शिक्षण, आरोग्य, नोक-या, स्वयंरोजगार यांमुळे सकारात्मक बदल दिसत असून देशात शिक्षण क्षेत्रात सहाव्या व आरोग्य क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेले राज्य आता दोन्हीमध्ये तिस-या क्रमांकावर आले आहे.”
खूपदा वैयक्तिक बाबींवर अर्वाच्च्य टीका होऊन देखील ‘मी पिडीत आहे’ असे भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी कधीही केला नाही किंबहुना त्यांनी त्याला अत्यंत योग्य पद्धतीने उत्तर दिले, असे निरिक्षण मयुरेश दिडोलकर यांनी मांडले.
अभिजित जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत ‘देवेंद्र डेव्हलपमेंट डॉक्ट्रीन’ या पत्रिकेबद्दल उपस्थितांना माहिती दिली तर डॉ. शिखा जैन यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post