'एमआयएम'ला सोबत घेण्यासाठी 'वंचित' केव्हाही तयार : प्रकाश आंबेडकर


एएमसी मिरर : वेब न्यूज 
एमआयएमसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत, दरवाजे अद्यापही खुले आहेत असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एमआयएम संविधानाची शपथ घेऊन काम करते त्यामुळे आम्ही एमआयएमला धर्मनिरपेक्ष मानतो. एमआयएमसाठी आम्ही दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केलेत आणि त्यांनीच दरवाज्याला टाळे लावले आहेत. त्याची चावी त्यांच्याकडेच आहे. एमआयएमसोबत आमच्या समितीची बोलणी सुरु आहेत. ती व्यवस्थित झाली तर सगळे व्यवस्थित होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित आघाडी हा पक्ष विरोधी पक्ष असणार असल्याचे म्हटले आहे. हे त्यांचे विधान भीतीपोटी केले असून मुख्यमंत्र्याच्या या विधानातून आमची ताकद वाढली असल्याचे त्यांनी मान्य केले आहे, असे आंबेडकर म्हणाले. आम्ही विरोधी पक्षात नसणार, तर आम्ही सत्ताधारी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे विधान केले होते. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
आंबेडकर म्हणाले की, राज्यातील अनेक भागात वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक घटकातील व्यक्ती पक्षात येऊन काम करण्यास तयार आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पक्षाची ताकद वाढली असून येत्या तीन दिवसात आम्ही २८८जागा वरील उमेदवाराची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच अनेक वेळा तुम्ही विधानसभा लढविणार का असा प्रश्न सतत विचारला जातो परंतु, मी विधानसभा लढविणार नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केली जाते. या पाण्यावर वीज निर्मिती झाल्यावर ते पाणी समुद्रात सोडले जाते. हे अनेक वर्षापासुन होत आले आहे. तेच पाणी दुष्काळी भागात पाणी घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र आजवर भोगलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर कधीच चर्चा केली नाही. यामुळे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आता आमची राज्यात सत्ता आल्यास धरण प्रशासनासोबत चर्चा केली जाईल आणि हे पाणी दुष्काळी भागात घेऊन जाणार आहोत. यामुळे पुढील काळात कोणत्याही व्यक्तीला पाण्यापासून वंचित राहणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, काही जण धर्माच्या, तर काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. अशा शब्दात भाजप सेना अणि आघाडीवर त्यांनी  निशाणा साधला. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत प्रश्नावर कोणताही पक्ष निवडणूक लढविता दिसत नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आता तरी राज्यातील पक्षांनी सर्व सामन्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवल्या पाहिजे. अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post