लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ८ दहशतवाद्यांना अटक


एएमसी मिरर : वेब न्यूज
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या एका मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ८ दहशतवाद्यांना अटक केली आहे. काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या ८ दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे 'लष्कर-ए- तोयबा'साठी काम करणाऱ्या काही लोकांविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिस आणि भारतीय सैन्याने मोठी कारवाई करण्यासाठी सर्च ऑपरेशन हाती घेतले. या ऑपरेशनदरम्यान ८ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
अजीज मीर, ओमर मीर, तौसीफ नजर, इम्तियाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या दहशतवाद्यांना अटक केली आहे त्यांचा बारामुल्ला येथील दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठी धमकी देणे आणि धमकीचे पोस्टर लावण्याच्या घटनांमध्ये सहभाग आहे.

Post a Comment

Previous Post Next Post