‘बघायचं नाही, बोलायच’; माजी महापौर कळमकरांचा नवा नारा


एएमसी मिरर : नगर 
नगरचे ऐतिहासिक वैभव जपतानाच शहराला आधुनिक काळाची झळाळी प्राप्त होण्यासाठी अशाच चळवळ ‘अहमदनगर पीक्स’ या माध्यमातून उभारण्याची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे. ‘बघायचं नाही, बोलायच’, असा मंत्र अहमदनगर स्पीक्स तमाम नगरकरांना देणार आहे. नगरचे युवा महापौर म्हणून कारकिर्द गाजवल्यानंतर कळमकर यांनी नगर शहराप्रती असलेल्या तळमळीतून नगरकरांचा आवाज योग्य यंत्रणेपर्यंत पोहचविण्यासाठी अहमदनगर स्पीक्स या सर्वांना सोबत घेवून चालणार्‍या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या अहमदनगर शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आधी मनात व नंतर प्रत्यक्षात होते, असे म्हटले जाते. नगरकरांच्या मनातही आपल्या शहराबाबत अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आपले शहर मोठे व्हावे, अन्य महानगरांच्या तुलनेल विकसित व्हावे, असे मनोमन प्रत्येकाला वाटते. यासाठी नगरकरांनी नगरकरांसाठी नगरकरांकडून कृतीयुक्त चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे.
अहमदनगर स्पीक्स या माध्यमातून सार्वजनिक समस्या मांडतानाच त्या समस्येची सोडवणूक कशा पध्दतीने होईल याबाबत प्रत्यक्ष कृती करण्यात येईल. कळमकर यांनी सांगितले की, आपण नगर शहराचे महापौरपद भूषवलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला. शहराचा एकंदरीत अभ्यास करून मूलभूत सुविधांच्या सोडवणुकीवर भर दिला. महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना येथील एकूणच कार्यपध्दतीचा सखोल अभ्यास केला.
लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली. याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी, माझ्याप्रमाणेच शहराप्रती चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरूणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर येते की, लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरु करण्याचे ठरवले. विकासासाठी निधी हे पालुपद ऐकुन नगरकर खरेच वैतागले आहेत.
अनेक योजनांसाठी निधी आल्यावर ती योजना पूर्ण होत नाही. याला कारण म्हणजे लोकांचा आवाज मोठा होत नाही. लोकशाहीत सर्वसामान्य माणूस फक्त मतदानापुरता उरला आहे. अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच नगरकरांनी जाब विचारुन, पाठपुरावाही सुरु केल्यास नगरचा विकास निश्चितच होईल व चांगला बदल घडेल, या विश्वासातून अहमदनगर स्पीक्स काम करेल. अहमदनगर स्पीक्स फक्त समस्या मांडण्याच्या चळवळीपुरते मर्यादित न राहता ते समस्यांच्या मुळापर्यंत जावून त्यावर उपाययोजना शोधण्याचाही प्रयत्न करणार आहे.
आजही विविध समस्यांवर आंदोलने होतात, अर्ज, विनंत्या केल्या जातात. परंतु, योग्य पाठपुराव्याअभावी किंवा दबावगटाअभावी त्यावर ठोस कृती होत नाही. आजपर्यंत चालत आलेली ही वहिवाट बंद होऊन नव्या युगातील नवे नगर घडविण्याचा संकल्प कळमकर यांनी केला आहे.
नगर शहराच्या तुलनेत पुणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांनी प्रगती केली यात तेथील लोकांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच योगदान नगरकरांनीही आपल्या शहरासाठी दिले पाहिजे. त्यामुळेच अहमदनगर स्पीक्स ही खर्‍या अर्थाने नगरच्या विकासाला चालना देणारी लोकचळवळ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तरूणाईच बदल घडवणार
आजची तरूणाई बेधड़क व आपल्या हक्कांप्रती अधिक सजग आहे. फोर जी, फाईव्ह जीप्रमाणे त्यांना सर्वकाही फास्ट हवे आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपापल्या परीने व्यक्त होत असतो, हिरिरीने मते मांडत असतो. अशा तरूणाईसाठी तर अहमदनगर स्पीक्स हक्काचे व्यासपीठ बनेल. राजकारणापलिकडे जावून कृती करण्याची वेळ आता आलेली आहे. सळसळत्या उत्साहाच्या या तरूणाईने ठरवले तर आजपर्यंत न झालेला सकारात्मक बदल नजीकच्या काळात नक्कीच पडलेला दिसेल, असा विश्वास अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केला आहे.

उमेदवारी संदर्भात पक्षाचा आदेश मान्य
अहमदनगर स्पीक्सचा कोणत्याही निवडणुकीशी काहीही संबंध नाही. केवळ शहरातील नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लागावेत. शहराचा विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. मागील तीन महिन्यांपासून या चळवळीवर काम चालू आहे. त्यामुळे निवडणुकीशी याचा संबंध नाही. असे स्पष्ट करतानाच उमेदवारी संदर्भात बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले की पक्ष जो आदेश देईल तो आपल्याला मान्य राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post