शरद पवारांच्या सभेनंतर राडा; पोलिसांकडून कळमकरांसह जगताप समर्थकांवर गुन्हे दाखल


एएमसी मिरर : नगर 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नगर येथील मेळाव्यानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कळमकर यांची वरीष्ठ नेत्यांनी समजून काढून त्यांना फिर्याद न देताच माघारी नेले होते. त्यामुळे वादावर पडदा पडला, असे चित्र असतानाच पोलिसांनी मात्र कळमकर, किरण काळे यांच्यासह आमदार जगताप समर्थक कार्यकर्त्यांविरुद्ध राडा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ज्यांना मारहाण झाली, त्या कळमकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने फिर्याद न देणे त्यांना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे.
नंदनवन लॉन येथे शनिवारी (दि.२१)  शरद पवार यांच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या दोन गटात धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर यांना बूट फेकून मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कळमकर हे फिर्याद देण्यासाठी कोतवालीत दाखल झाले होते. मात्र, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, विद्यमान आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष माणिकराव विधाते, माजी नगरसेवक आरिफ शेख, अजिंक्य बोरकर आदींनी अभिषेक कळमकर  यांची समजूत काढत फिर्याद न देताच माघारी नेले. मात्र, रात्री उशिरा पोलीस कॉन्स्टेबल पवन लहारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडेकर, सुरेश बनसोडे, तौसीफ शेख, संतोष ढाकणे, जय लोखंडे व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आपसात भांडण करून शिवीगाळ, दमदाटी करून पोलिसांसमोर झुंज केल्याबाबतचा गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून आपसांत वाद मिटल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी कळमकर यांच्यावरही गुन्हा दाखल केल्यामुळे फिर्याद न देणे त्यांना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. कोणी काहीही म्हणत असले तरी, त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, घडलेल्या प्रसंगाबाबत माझी प्रतिक्रिया मी देणार आहे, असे कळमकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post