एएमसी मिरर : वेब न्यूज
गडचिरोलीत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्यामधील ६० टक्के गावांना पुराने वेढले असून, १५० गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच २५ जनावरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून देवालमरी-अहेरी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागातील अनेक गावांत नाल्याचे पाणी शिरले आहे. त्यामुळे गडचिरोलीत अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
जनजीवन विस्कळीत झाले असून जनावरे पुरात वाहून गेली. या घटनेची माहिती मिळताच विद्युत सेवा खंडित करण्यात आली. सद्य:स्थिती भामरागड तालुक्यातील ६० टक्के गावे पुराच्या वेढ्यात अडकली आहेत. तर ६०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून प्रशासनाने जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच पर्लाकोटा पामुलागौतम बंढीया नदीला पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोलीतील १५०गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आष्टी पुलावरील पाणी ओसरू लागल्याने गडचिरोली-नागपूर मार्ग सुरू झाला.
तसेच दिना नदीला आलेला पूरही ओसरू लागल्याने आलापल्ली-गडचिरोली मार्ग सुरू झाला आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी पाऊस असल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग अद्याप बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे भामरागड तालुक्यातील पुराची परिस्थिती कायम पाहायला मिळत आहे.
Post a Comment