अल कायदाला पाकिस्तानातच प्रशिक्षण दिले होते; इम्रान खान यांची कबुली



एएमसी मिरर : वेब न्यूज
दहशतवादी संघटना अल कायदाला पाकिस्तानातच प्रशिक्षण देण्यात आले होते. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापूर्वी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. दहशतवादाविरूद्ध हा पाकिस्तानचा सर्वात मोठा कबुलीजबाब मानला जात आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांबाबत धोरण बदलले. परंतु पाकिस्तानी लष्कर तसे करू इच्छित नसल्याची माहितीही त्यांनी अमेरिकन थिंक टँक ‘काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मध्ये (सीएफआर) बोलताना दिली.
कार्यक्रमादरम्यान, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचं एबटाबाद येथील वास्तव्य आणि अमेरिकन नौदलामार्फत मारला गेल्याच्या घटनेचा पाकिस्तान सरकारने तपास का केला नाही? असा सवाल इम्रान खान यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना आम्ही या घटनेचा तपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने 9/11 पूर्वी अल कायदाला प्रशिक्षण दिलं होतं. यामुळेच त्या संघटनेचे पाकिस्तानशी कायम संबंध जोडले जात होते, असेही ते म्हणाले.
अल कायदा आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनवर पाकिस्तानकडून गेल्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कबुलीजबाब देण्यात आला आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये असल्याची आपल्याला माहिती होती, असे म्हटले होते. आयएसआयने सीआयएला ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारावर अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली, असे त्यांनी सांगितले होते.

Post a Comment

Previous Post Next Post