धरणातून पाणी सोडल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ


एएमसी मिरर : वेब न्यूज
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत २४ तासांत १५ फुटांनी वाढ झाली असून यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा औदुंबरच्या दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. तर वारणा नदी पात्राबाहेर पडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून चांदोली व कोयनेतील विसर्ग सायंकाळी चार वाजल्यापासून १५ हजार क्युसेकने कमी करण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे चांदोली धरणातून होत असलेला १५ हजार ३४४ क्युसेकचा विसर्ग कमी करून ११ हजार ७०३ करण्यात आला आहे, तर कालपासून कोयना धरणातून सुरू असलेला ८५ हजार ६७३ क्युसेक विसर्ग आज दुपारी ४ वाजल्यापासून कमी करण्यात आला आहे.
धरणाचे वक्राकार दरवाजे दहा फुटांवरून आठ फूट करण्यात आले असून होत असलेला विसर्ग ७० हजार ४०४ क्युसेक इतका आहे. तरीही  अगोदर करण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असून हा विसर्ग उद्यापर्यंत कायम राहिला अथवा पावसाचा जोर वाढला तर सांगलीतील आयर्वनि पुलाजवळ पाण्याची पातळी उद्या शुक्रवापर्यंत ३४ फुटांपर्यंत जाण्याचा धोका आहे. यामुळे शहरातील मगरमच्छ कॉलनी, काकानगर परिसरातील काही भागात पुराचे पाणी शिरू शकते.
अलमट्टी धरणातून १ लाख ९ हजार ३६६ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आयर्वनि पुलाजवळ  १६ फूट ३ इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी ४५ फूट) तर अंकली पुलाजवळ (हरिपूर) १८ फूट ५ इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोकापातळी ५० फूट ३ इंच).
दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी ४.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (कंसात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये) पुढीलप्रमाणे. मिरज- २.२ (४९६.८), जत -निरंक (१८३.८), खानापूर-विटा – १.६ (३१३.२), वाळवा-इस्लामपूर  -९.५ (६७८.४), तासगाव – ०.६ (३७९.१), शिराळा – १९.७ (१७४०.७), आटपाडी – निरंक (१८४.१), कवठेमहांकाळ – ०.२ (२८९.४), पलूस – ४.५ (४०६.३) व कडेगाव – ४.८ (६६९.६).

Post a Comment

Previous Post Next Post