सांगलीत पुन्हा पुराचा धोका; एनडीआरएफची पथके दाखल


एएमसी मिरर : वेब न्यूज 
कोयना, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे.  धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. सांगलीत सोमवारी पाणी पातळी 34 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नदीकाठावरील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून एनडीआरफ पथकाच्या दोन तुकड्या मिरज व इस्लामपूर येथे तयार ठेवण्यात आल्या आहेत. 
सांगलीसह जिल्ह्याच्या विविध भागात रविवारीही पाऊस सुरू होता. त्यातच कोयना आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे पुन्हा महापूर येणार की काय, असे अनेकांना वाटत होते. मात्र कोयनेतील विसर्ग सायंकाळी 69 हजारवरून 53 हजार 882 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना बोलवले आहे.


सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सायंकाळी ती 30.2 फूट झाली होती. हवामान खात्याने पावसाचा दिलेला अंदाज आणि कोयना व इतर धरणातून वाढलेला विसर्ग यामुळे  सांगलीत पाणी पातळी 34 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.  त्यामुळे नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी.  नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे .
खबरदारीची उपाययोजना म्हणून इस्लामपूर येथे एक व मिरज येथे एक एनडीआरएफचे पथक तयारीत ठेवण्यात आलेले आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post