भूमि अभिलेखचा लिपिक ‘लाचुलचपत’च्या जाळ्यात


एएमसी मिरर : श्रीरामपूर
जमिनीची मोजणीची तारीख देण्यासाठी 10 हजाराची लाच स्विकारणार्‍या श्रीरामपूर येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील छानणी लिपिकास नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बाबुराव यादवराव राशिनकर (रा. वॉर्ड नं. 7, कौशिक अपार्टमेंट, श्रीरामपूर) असे लाचप्रकरणी ताब्यात घेतलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एका शेतकर्‍याची नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर भोकर शिवारात 30 आर जमिन आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी संबंधित शेतकर्‍याने मे महिन्यात श्रीरामपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात रितसर 22 हजार 500 रुपये भरले होते.
त्यानुसार मोजणी करण्यात आली. मात्र मोजणी पूर्ण न झाल्याने संबंधित शेतकर्‍यांने पुन्हा मोजणीची तारीख मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र मोजणीची तारीख मिळण्यासाठी संबंधित अधिकार्‍याने 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करुन 10 हजार रुपयांवर ठरले होते.
दरम्यान, या घटनेबाबत टाकळीभानच्या संबंधित शेतकर्‍याने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्याशी संपर्क करुन याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार नगर व नाशिक विभागाचे सुमारे 8 अधिकारी व 2 पंच अशा 10 कर्मचार्‍यांच्या पथकाने काल पहाटेच श्रीरामपूर उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसराची पाहणी करुन सापळा रचला.
संबंधित शेतकरी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भूमि अभिलेख कार्यालयात आले. त्यावेळी शेतकर्‍यांकडून छानणी लिपिक बाबुराव राशिनकर हे 10 हजार रुपये रोख रक्कम स्विकाराताना आढळून आल्याने लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या पथकामध्ये अहमदनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, सहाय्यक अधिकारी पोलीस निरीक्षक दिपक करंडे, पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर, नाशिक विभागाचे अप्पर पोलीस निलेश सोनवणे यांच्यासह नाशिक भूमि अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post