महाजनादेश यात्रेच्या मार्गातून ‘चितळे रोड’ला थर्ड


एएमसी मिरर : नगर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी (दि.13) नगरमध्ये येत आहे. शहरात ‘रोड शो’ केला जाणार असल्याने भाजपकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. 500 दुचाकींचा सहभाग असलेली मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली. दरम्यान, रॅलीच्या नवीन मार्गातून चितळे रोड व नेता सुभाष चौक वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महाजनादेश यात्रेचे नवनागापूर येथे पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत होणार आहे. तेथून मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. नवनागापूर येथून ही यात्रा सह्याद्रीचौक, कॉटेज कॉर्नर, हॉटेल परिचय, सावेडी गाव येथे येणार आहे. तिथे यात्रेच्या स्वागताची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जय्यत तयारी केली आहे. तेथून पुढे फुलारी पेट्रोलपंप, महालक्ष्मी उद्यान चौक, भुतकरवाडी चौक, महावीरनगर मार्गे दीपक पेट्रोल पंप, सारडा महाविद्यालय, पत्रकार चौक, तेलीखुंट, कापडबाजार, माणिकचौक, तख्ती दरवजा, श्रीपाद ग्रंथभांडार, जुनी महानगरपालिका, महालक्ष्मी मंदीर माळीवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक (बसस्थानक) येथे रॅलीचा समारोप केला जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या मागील दौर्‍यात एमआयडीसी ते नगर शहर रॅली व गांधी मैदान येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या दौर्‍यात केवळ ‘रोड शो’ होणार आहे. मात्र, मागील दौर्‍यात असलेल्या रॅलीच्या मार्गातून चितळेरोड, नेतासुभाष चौक वगळण्यात आले आहे. शहर भाजप व शहर शिवसेना यांच्या सुरु असलेला वाद व चितळे रोडला थर्ड मारुन यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातमी : मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यापूर्वीच ‘युती’त संघर्ष; राठोड यांच्या उमेदवारीला गांधींचा विरोध

Post a Comment

Previous Post Next Post