महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा; १३ सप्टेंबरला नगर जिल्ह्यातून सुरुवात


एएमसी मिरर : नगर 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे पहिली सभा होणार असून त्यानंतर संगमनेर, राहुरी येथे सभा होणार आहेत. लोणी येथे यात्रेचे स्वागत व नगर शहरात त्याच दिवशी सायंकाळी 'रोड शो' केला जाणार आहे. नगर शहरातील सभा मात्र, या दौऱ्यातही रद्द करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबरला सकाळी नगर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर काष्टी येथे यात्रेचे स्वागत होणार आहे. तेथून मुख्यमंत्री फडणवीस दौंड, बारामतीकडे रवाना होणार आहेत. तिथे जाहीर सभा होणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे नगर शहर व जिल्ह्यातील यात्रेचा एक दिवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भाजप वर्तुळात नाराजीचे वातावरण होते. आता तिसऱ्या टप्प्याची सुरुवातच नगर जिल्ह्यात होणार असून नगर शहरातही 'रोड शो'च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post