भाजप सरकारच्या काळात जातीय तणाव वाढल्याचा पोलिस खात्याचा अहवाल


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजप सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढल्याचा व हिंदु-मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात दलित-सवर्ण तणावाने घेतली असल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत वृत्त दिले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा बुधवारी बैठकीत घेतला. त्यात राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात दलित-सवर्ण तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला असल्याचे समोर आले आहे. हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील 8 जिल्हे संवेदनशील म्हणून पोलिसांनी निवडले आहेत. तर त्या तुलनेत दलित-सवर्णांमधील तणाव असलेल्या 14 जिल्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. मात्र गेल्या काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा दलित-सवर्ण तणावाची व्याप्ती वाढली असल्याचं समोर आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि पूर्व विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यांत सवर्ण आणि दलितांमध्ये गेल्या पाच वर्षात तणावाच्या अनेक घटना घडल्याचे यात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post