केडगावच्या देवी परिसरात उपाययोजना करा : महापौर वाकळे


एएमसी मिरर : नगर
केडगाव देवी मंदिर परिसरात नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तसेच केडगाव देवी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. यामुळे देवी मंदिर ते रेल्वे पुल हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढली होती. नवरात्र उत्सव काळामध्ये भाविक या रस्त्याने पायी दर्शनासाठी येत असतात. यावेळी देवी मंदिर रोडवरील स्ट्रीट लाईट देखभाल दुरूस्ती साफसफाई रस्त्याच्या कडेची झाडे झुडपे काढणे, औषध फवारणी करणे, ड्रेनेज लाईनच्या चेंबरवरील तुटलेले झाकणे बदलणे, याबाबतच्या सुचना संबंधीत अधिकारी यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
नवरात्र उत्सवानिमित्त केडगावदेवी मंदिर परिसरात करावयाच्या उपाययोजनांबाबत केडगावमधील नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यानंतर महापौर वाकळे यांनी महापालिकेत केडगाव विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेवून विविध सूचना दिल्या.
यावेळी नगरसेवक मनोज कोतकर यांनी सांगितले की, केडगांव देवी याठिकाणी नगर शहर व तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून भाविक भक्त 10 दिवस दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मोठ्या पुलाच्या जवळील भागाची झाडे झुडपे साफ सफाई तसेच जास्त उजेडासाठी मर्क्युरी लॅम्प लावण्याबाबत सांगितले. त्यासाठी मंदिराच्या बाजूला असलेला परिसर साफसफाई करणे, मंदिर परिसरात महिला व पुरुषांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करणे, तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, विद्युत व्यवस्था देखील चांगल्या प्रमाणात पुरेशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post