मराठी माणसाने आपले घर आणि संपत्ती मराठी माणसालाच विकावी : मनसेएएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदा ‘जय मराठी’चा नारा दिला आहे. ‘आपलं ठाणे मराठी ठाणे’, अशी मोहीम हाती घेतली आहे. आपले घर आणि मालमत्ता मराठी माणसालाच विका, अशी साद मनसेने घातली आहे. ठाण्यातील एका सोसायटीत दोन रहिवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे भांडण गुजराती आणि मराठी व्यक्तीमध्ये झाल्याचं समोर आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.
नौपाड्याच्या विष्णुनगर भागातील सुयश सोसायटीत राहणारे राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्यात इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर २०१९ रोजी वाद झाला होता. त्यावेळी, शहा पिता-पुत्राने पैठणकर यांना बेदम मारहाण केली होती.’मराठी-घाटी तुझी नौपाड्यात राहायची लायकी नाही’, असे आक्षेपार्ह विधानही त्यांनी केले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांना कान धरून माफी मागायला लावली होती. या माफीनाम्याचा हा व्हिडीओ तुफान हिट झाला आहे. हा प्रतिसाद पाहूनच मनसेनं आपले हक्काचं ‘मराठी’ नामक ‘ब्रह्मास्त्र’ पुन्हा बाहेर काढल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यात काही लोकांना मराठी माणसांची ॲलर्जी असू्न मराठी माणूस जर घ्यायला पुढे गेला तर समोरची व्यक्ती त्याला नकार देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या परिस्थितीत मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य करायलाच हवे. म्हणूनच मराठी माणसाला जर आपले घर किंवा दुकान विकायचे असेल तर मराठी माणसाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ठाण्यातील मनसे पदाधिका-यांनी केले आहे. ठाण्यातीत काही भागांमध्ये तसे फलकही लावण्यात आले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु, ही निवडणूक आपण लढवायला हवी अशी कार्यकर्त्यांची ‘मनसे’ इच्छा आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणी म्हणूनही या मोहिमेकडे पाहता येऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post