खासदार विखेंच्या मध्यस्थीमुळे क्रीडांगणासह ‘आयुष’चाही मार्ग मोकळा


एएमसी मिरर : नगर
तारकपूर येथील शाळेलगत  असलेल्या क्रीडांगणावरच ‘आयुष’चे हॉस्पिटल उभारण्याच्या निर्णयाविरोधात विद्याथी व पालकांनी सुरू केलेल्या ‘डब्बा बंद’ आंदोलनाची दखल घेऊन खा.सुजय विखे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला आहे. हॉस्पिटल उभारणीच्या प्लॅनची दिशा बदल्याचा निर्णय जाहीर करत, हॉस्पिटल उभारताना क्रीडांगणाला बाधा येणार नाही, शाळेसाठी क्रीडांगण उपलब्ध राहील, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सेंट विवेकानंद हायस्कूलच्या शेजारीच असलेल्या क्रीडांगणावर आयुषचे हॉस्पिटल प्रस्तावित करण्यात आले आहे. इतरत्र मोठी जागा उपलब्ध असून प्लॅनची दिशा बदलावी, या मागणीसाठी विवेकानंद स्कूलचे सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सकाळपासून मैदानावर ठिय्या देत ‘डब्बा बंद’ आंदोलन सुरु केलेे. खासदार विखे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या व आंदोलनस्थळी येवून शाळा व्यवस्थापन, पालकांशी संवाद साधला. शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, सभागृह नेते स्वप्निल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, अजिंक्य बोरकर, सिंधी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान, सचिव दामोदर बठेजा, प्राचार्या गीता तांबे आदींसह पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे विश्वस्त आदी यावेळी उपस्थित होते.


खासदार विखे यांनी जागेची पाहणी करुन क्रीडांगणासाठी जागा ठेवून हॉस्पिटलची उभारणी कशी होईल, याची माहिती अधिकार्‍यांशी चर्चा करुन घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, डॉ.बापूसाहेब गाडे आदींनी त्यांना माहिती दिली. संस्थेचे सचिव बठेजा यांनी प्रस्तावित ‘आयुष’ला शाळेचा कोणताही विरोध नसल्याचे प्राधान्याने स्पष्ट केले. मात्र, ती शासकीय जागा असली, तरी अनेक वर्षांपासून या जागेचा क्रीडांगण म्हणूनच वापर केला जातो. हॉस्पिटल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तरीही जाणीवपूर्वक क्रीडांगण उपलब्ध राहणार नाही, अशा पद्धतीने प्लॅन तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. प्लॅनमध्ये दिशा बदलण्याची मागणी त्यांनी केली. त्यातून क्रीडांगण आणि हॉस्पिटल दोन्ही हेतू साध्य होतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


सुजय विखे यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करुन प्लॅनची दिशा बदलण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिले. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. कोणत्याही परिस्थिीत क्रीडांगणाला धक्का पोहचणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. जागा शासकीय असल्यामुळे त्याला कंपाऊंड टाकण्यात येईल व क्रीडांगणाचा वापर करण्यासाठी शाळेच्या बाजूने प्रवेशद्वार केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी खासदार असेपर्यंत क्रीडांगणाचा वापर करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, क्रीडांगण न राहिल्यास मी राजीनामा देईन, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. विखे यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आंदोलन मागे घेतले. शाळा व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांनी सुजय विखे यांचे आभार मानले.
दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनीही विखे यांचे आभार मानले. मूळातच हॉस्पिटल उभारण्यासाठी कुणाचाही विरोध नव्हता आणि नाही. मात्र, ते रस्त्याला पलिकडे न उभारता निकषानुसार जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभारायला हवे, असे ते म्हणाले.

माजी खासदारांविरोधात व्यवस्थापनाची नाराजी
आयुष हॉस्पिटलला कुणाचाही विरोध नव्हता. माजी खासदारांची याबाबत अनेकवेळा भेट घेतली. त्यांना जागेवर येऊन पाहणी करण्याचीही विनंती आम्ही केली. हॉस्पिटलच्या प्लॅनची फक्त दिशा बदलली तर मार्ग निघतो, हेही त्यांना निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, अशा शब्दांत बठेजा यांनी दिलीप गांधी यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' आदेशाचे झाले तरी काय?
शाळा व्यवस्थापनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सर्व परिस्थितीही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. सचिवांकडून तसे लेखी पत्रही पाठविण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पुढे काय झाले? आदेश दाबण्यामागे काय गौडबंगाल झाले? हे कुणालाच कळाले नाही, अशी टिपण्णीही बठेजा यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post