समुद्रातील सर्वात मोठ्या ‘ड्राय डॉक’चे उद्घाटन


एएमसी मिरर : वेब न्यूज
मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हा दुरूस्ती तळ उभारला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज (शनिवार) या ड्राय डॉकचं उद्घाटन करण्यात आलं. समुद्रातील पाण्यावर तब्बल 5.68 कोटी घन मीटरचे हे बांधकाम करण्यात आलं आहे.
सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये एकमेव युद्धनौका कार्यरत आहे. कारवारमध्ये या युद्धनौकेचा तळ असला तरी दुरूस्तीसाठी मात्र या युद्धनौकेला कोचीनच्या जहाजबांधणी कारखान्यात जावं लागतं. यासाठीच मुंबईत ड्राय डॉकची उभारणी करण्यात आली आहे. पश्चिम कमांडच्या मुख्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे. 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद व 17 मीटर खोल असा तळ उभारण्यात आला आहे. या तळाच्या उभारणीसाठी समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचे सिमेंट टाकण्यात आले असून दोन्ही बाजूंनीही सिमेंटच्या ठोकळ्यांची भिंत उभारण्यात आली आहे. ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौकाही याठिकाणी दुरुस्त होऊ शकते.
तसंच या ठिकाणी दुरूस्तीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, पाणी काढण्यासाठी मोठे पंपही लावण्यात आले आहेत. तसंच जर आग लागण्याची घटना घडली तर त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा तळाशी उभारण्यात आलेल्या भितींमध्ये बसवण्यात आली आहे. हा तळ उभारण्यासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post