एएमसी मिरर : नगर
नगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची तडकाफडकी घनकचरा विभागात बदली करण्यात आल्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपायुक्तांच्या चौकशी अहवालानंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी हे आदेश बजावले असून, बोरगे यांच्याकडील आरोग्य प्रशासन व व्यवस्थापना कार्यभार काढून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोरगे यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. त्यांचा कार्यभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डेंग्यूसदृश्य आजाराने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागरिकांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. उपायुक्त सुनील पवार यांनी चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. त्या आधारावर आयुक्तांनी हे आदेश बजावले आहेत. आदेशानुसार डॉ. बोरगे यांच्याकडे आता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दैनंदिन कचरा संकलन व वाहतूक तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. तसेच कोंडवाडा विभागाचे नियंत्रणही त्यांच्याकडेच राहणार असून मोकाट कुत्रे व जनावरे नियंत्रण व व्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे.
डॉ. बोरगे यांना कार्यमुक्त करत बदली केलेल्या विभागात रुजू होण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले असून, आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही आदेशातच देण्यात आला आहे.
मोकाट जनावरे पाहून आयुक्त संतापले
आयुक्त भालसिंग यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी आज (दि.१२) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर पाहणी केली होती. यावेळी यात्रेच्या मार्गावर सर्जेपुरा परिसरात मोकाट जनावरे आढळून आल्यामुळे आयुक्त भालसिंग चांगलेच संतापले होते. मोकाट जनावरे पकडण्याबाबत आदेश देउनही कारवाई होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मनपात पोहोचल्यावर त्यांनी बोरगे यांच्या बदलीचे आदेश बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
Post a Comment