मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यापूर्वीच ‘युती’त संघर्ष; राठोड यांच्या उमेदवारीला गांधींचा विरोध


एएमसी मिरर : नगर
राज्यातील एखादी दुसरी जागा शिवसेनेला द्यावी. मात्र, नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातून 54 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे ही जागा मिळविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध कायम राहील, असेही गांधी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर दौर्‍यापूर्वीच शहरात शिवसेना-भाजपात संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी (दि.13) नगरमध्ये येत आहे. या पार्श्वभूमीवर शहर भाजपने पत्रकार परिषद घेऊन नगरच्या जागेवर दावा ठोकला आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार अनिल राठोड यांच्या उमेदवारीलाही गांधी यांनी विरोध दर्शविला आहे. गांधी म्हणाले की, लोकसभेवेळी त्यांना मी नको होतो. आता आम्हालाही ते नको आहेत. मित्रपक्ष म्हणून कसे बोलायचे, वागायचे याचे तारतम्यही त्यांनी कधीच बागळले नाही. त्यांना उमेदवारी दिली तरीही आमचा विरोध कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरची जागा भाजपला मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. 25 वर्षे त्यांनी केवळ द्वेषाचे व भावनेचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी राठोड यांच्यावर केला आहे. नगरच्या जनतेला आता बदल हवा असून, त्यासाठी जागा भाजपला मिळावी असा ठरावही आम्ही केला आहे. शहराची जागा भाजपलाच मिळेल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, श्रीकांत साठे उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभेवेळी शहर शिवसेनेने दिलीप गांधी यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्या विरोधाची परफेड शहर भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वी शिवसेना-भाजपात उमेदवारीवरुन संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post