नगर शहरातील विनापरवाना मंडप हटविला; मनपाची कारवाई


एएमसी मिरर : नगर 
परवानगी न घेता उभारण्यात आलेला गणेश मंडळाचा मंडप महापालिकेच्या पथकाने कारवाई करुन हटविला आहे. सोमवारी (दि.2) सातभाई मळा परिसरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेश मंडळांनी अटी-शर्तींचे पालन करुन परवानगी घेऊनच मंडप उभारावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. तसेच विनापरवाना मंडप, अतिक्रमणांबाबत तक्रारीसाठी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. सातभाई मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मित्र मंडळ यांनी विनापरवाना मंडप उभारण्याची तक्रार मनपाकडे करण्यात आली होती. मनपाच्या अधिकार्‍यांनी याची तात्काळ दखल घेत गणेश मुर्तीची स्थापना करण्यापूर्वीच सदर मंडळाचा मंडप हटविला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशीच मनपाकडून झालेल्या कठोर कारवाईमुळे गणेश मंडळांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तहसीलदारांच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसांत मंडपांची तपासणी करण्यात आलेली आहे. काही अहवाल जमा झाले असून, उर्वरीत उद्या सादर होतील. त्यानुसार विनापरवाना उभारलेले, मंजूर जागेऐवजी वाढीव जागेचा वापर करुन उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर मंडपांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असेही अभियंता इथापे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post