'अर्बन'च्या कर्जवाटपात अनियमितता; अहवाल रिझर्व्ह बॅंकेला सादर


एएमसी मिरर : नगर
रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या मागील लेखा परीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत पूर्तता करण्याचे काम बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. यावर्षीचे लेखापरीक्षणही झालेले आहे. यात कर्ज वाटपामध्ये अनेक अनियमितता आढळल्याची माहिती नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. लेखा परीक्षणाचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासक मिश्रा म्हणाले की, लेखापरीक्षण अहवालात कर्ज वाटपामध्ये अनियमितता आहेत. अनेक बँकांमध्ये अशा प्रकारच्या अनियमितता असतातच. मात्र, या बँकेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत. या अनियमिततांबाबत आम्ही अद्याप कुणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही. लेखा परीक्षणाचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आलेला आहे. याबाबतचा निर्णय, कारवाई सर्व प्रक्रिया रिझर्व्ह बँकेकडूनच होईल. मागील लेखापरीक्षणात आक्षेपांबाबत पूर्तता करण्याचे कामही बँकेचे अधिकारी करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी, उपव्यवस्थापक राजेश डोळे आदी उपस्थित होते.

२५० कोटी ठेवी कमी झाल्या 
बॅंकेची वसुली व ठेवींबाबत बोलताना प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर सुमारे दोनशे ते अडीचशे कोटींच्या ठेवी कमी झाल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले. ठेवी काढून घेणाऱ्यांमध्ये बँका व पतसंस्था यांचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा झाली असून, 83 कोटींच्या ठेवी नव्याने वाढलेल्या आहेत. बँकेने वसुलीसाठी पाच पथके तयार केली आहेत. अद्यापर्यंत 24 कोटींची वसुली झालेली आहे. ही वसुली समाधानकारक नसली तरी यात वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

२० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त 
सुमारे दोनशे ते अडीचशे कोटींच्या कर्जाची खाती एनपीएमध्ये आहेत. या थकबाकीदारांना पैसे भरण्याबाबत बँकेकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. सुमारे ५० ते ६० थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तर २० थकबाकीदारांच्या मालमत्ता बँकेने जप्त केल्या आहेत. त्याची कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. थकबाकी वसुलीसाठी संचालकांसमवेत दोन वेळा बैठक घेतली आहे. थकबाकीदारांना पैसे भरण्यास प्रवृत्त करण्याबाबत प्रयत्न करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ओव्हरड्यू व एनपीएमध्ये असलेल्या कर्ज खातेदारांना बँकेतून दररोज पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोने तारण कर्ज झाले बंद 
प्रशासक नियुक्तीनंतर अनेकांनी ठेवी काढण्यास सुरुवात केल्यामुळे सोने तारण कर्ज देणे सध्या बंद केलेले आहे. येत्या काळात लवकरच ते सुरू केले जाईल, असेही प्रशासक मिश्रा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

बॅंकेची विशेष ठेव संकल मोहीम
बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी १ ऑक्टोबरपासून विशेष ठेव संकलन मोहीम सुरु करण्यात येत असल्याची माहितीही प्रशासक मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्‍टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांना आकर्षक भेटवस्तू बँकेकडून दिली जाणार आहे. तसेच १६ ऑक्टोबर पासून १ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी 'अखंड ठेव योजना' बँकेकडून राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत निर्धारित व्याजदरापेक्षा ०.१५ टक्के ते ०.२५ टक्के अधिक व्याजदर या ठेवींवर दिला जाणार आहे. ठेवीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post