'कुणाला बसवायचे हे जनता ठरवेल, गुंडगिरीला आता थारा नाही'


एएमसी मिरर : नगर
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर माझ्याबाबत घडलेला प्रकार निंदनीयच आहे. ज्यांनी केला ते अल्पबुध्दीचे व सामाजिक भान नसलेले आहेत. आम्ही शरद पवारांच्या विचारांना माननारे आहोत. त्यामुळे वरीष्ठांच्या सूचना पाळून पक्षांतर्गत वाद असल्याने तक्रार दिली नाही. मात्र, याचा चुकीचा अर्थ काढू नये. कुणाला बसवायचे आणि कुणाला उठवायचे हे जनता ठरवेलच. यापुढे गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यात कळमकर यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या कळमकर यांनी माघार घेतल्याने वाद संपुष्टात आल्याचे चित्र होते. या पार्श्‍वभूमीवर आज अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषद घेउन आपली भूमिका मांडली.
अभिषेक कळमकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रगल्भ विचारसारणीचा पक्ष आहे. माझे आदर्श दादाभाऊ यांनी आणि मी हा विचार जपला आहे. काल घडलेला प्रकार निदंनीयच आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यातही गेलो होतो. मात्र, पक्षांतर्गत वाद असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी तक्रार दिली नाही. परंतु, याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत, असा नाही. सगळा प्रकार पक्षाध्यक्ष व वरीष्ठांपर्यंत गेलेला आहे. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतो. जे व्हायचे ते होऊन गेले. यापुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी माझे नाव चर्चेत असले, तरी पक्ष घेईल तो निर्णयच अंतिम असेल, असेही कळमकर यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post