शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला : अजित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही. तरीही त्यांचे नाव यामध्ये गोवण्यात आले.  ईडीने शरद पवार यांचं नाव अशासाठी दिलं की, अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझं आणि शरद पवार यांचं नाते असल्याने ईडीने त्यांचे नाव या प्रकरणात आणले. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यामुळे याच विषयाची चर्चा सुरु आहे. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल होते. आज अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले की, शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाला. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका, असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. तसंच निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे सगळं समोर का आलं? असाही प्रश्न त्यांनी विचारला. 2010 च्या प्रकरणात 2019 मध्ये गुन्हा का दाखल केला ? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसंच पवार कुटुंबात काहीही कलह नाही, कशाचा गृहकलह? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसेच शरद पवारांचा शब्द आमच्या कुटुंबात अंतिम असतो असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला. शिखर बँक प्रकरणात 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच 12 हजार कोटीपर्यंत आहेत, त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

Post a Comment

Previous Post Next Post