ईडीच्या भीतीमुळे उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात : अमोल कोल्हे


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यामुळे ते घाबरून आहेत, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने अमोल कोल्हे दापोलीत आले होते. शिवस्वराज्य यात्रेची दापोलीतील सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आली. यावेळी बोलताना कोल्हे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेने सुरू केलेली जन आशीर्वाद यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली ते कुणालाही कळले नाही. गेल्या पाच वर्षांत सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केलेला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ लाख ४४ हजार युवक बेरोजगार झाले आहेत. कायदा व सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना आपली वाटत आहे. रस्तोरस्ती आमचे होणारे स्वागत ही विजयाची नांदी असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
युतीच्या काळात गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला गेला; पण महाराष्ट्रात शिवरायांचे स्मारक उभारण्याच्या बाबतीत शिवसेना अपयशी ठरली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या सन्मान योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का, असे आदित्य ठाकरे राज्यभर विचारत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही हे लक्षात येऊनही शिवसेना गप्प का? महाराष्ट्र शासनाने महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जात असताना शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले? आता महाराजांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे, असे विधान त्यांनी यावेळी केले. या सभेला महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय कदम, सरचिटणीस अमोल मिटकरी, तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post