Video : ‘दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.. इथे भिडेही जन्माला आला’एएमसी मिरर : वेब न्यूज
पंतप्रधान मोदी चुकीचे बोललेत. या जगाला बुध्दांची गरज नाही, असे वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे गुरुजींवर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘ दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की, इथे नथुराम जन्माला आला अन् तिथेच भिडेही जन्माला आला’, असे म्हणत त्यांनी भिडे गुरुजींवर निषाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून जे सर्वजण भिडेंचे शिष्य असल्याचे सांगतात, त्यांनीच आता जाहीर करावे, ते बुध्दांबरोबर आहेत की, भिडेंबरोबर? असे आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
सांगली येथील कार्यक्रमात बोलतांना संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्र संघातील ‘भारताने युध्द नाही तर बुध्द दिला’ या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. मोदी चुकीचे बोललेत, असेही ते म्हणाले होते. तसेच या जगाला बुध्दांची गरज नाही, असे वक्तव्यही केले होते. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ‘बुध्द’ समजून घ्यायला, भिडेंकडे बुध्दी नाही, असा टोला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : बुद्ध उपयोगाचा नाही; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर संभाजी भिडेंचा आक्षेप

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जगाच्या व्यासपिठावर बोलतांना कुठल्याही भारतीयाला अत्यंत अभिमानाने जी काही दोन-चार नावे घ्यावीशी वाटतात, त्यातील पहिले नाव म्हणजे, गौतम बुध्द आहे. समता आणि बंधुत्व हे त्यांनी सांगितले. राजा असताना उद्विग्न झालेल्या सिध्दार्थने सर्व त्याग केले. राजघराणे, सिंहासन, सोनं-नाणं सोडून वैराग्याचं जीवन जगायला गेले, ते गौतम बुध्द. येथील चातुर्वाण्यांविरुध्द उभे राहिले ते गौतम बुध्द. बुध्द समजून घ्यायला बुध्दी लागते. ती भिडेंकडे नाही. गौतम बुध्द, भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी, संत गोराकुंभार अशांचे विचार घेऊन आपण पुढे जातो. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन अख्खा महाराष्ट्र उभा राहतो. आणि भिडे गुरुजी अत्यंत आक्षेपार्ह विधान गौतम बुध्दांबद्दल या वेळेला करतात? आणि तेही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन? बुध्द समजलाय का त्यांना कधी?  शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जाती-पातीचे राजकारण तुम्हाला आता महाराष्ट्रात आणि देशात करता येणार नाही. धर्मविद्वेष पसरवता येणार नाही. पंतप्रधान मोदींपासून सगळे जे स्वतःला त्यांचे शिष्य म्हणवतात, त्यांनी आज सांगावे की, तुम्ही बुध्दांबरोबर आहात की भिडेंबरोबर? दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की, इथे नथुराम जन्माला आला अन् तिथेच भिडेही जन्माला आला.”

Post a Comment

Previous Post Next Post