नव्या पिढीसमोर 'छमछम'चा आदर्श ठेवणार का, शरद पवारांचा खोचक सवाल


नगर : प्रतिनिधी
शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांमध्ये आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. शिवरायांच्या काळात ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी चमकायच्या, त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला आहे. असा आदर्श भाजप आणि त्यांची ‘मित्र’सेना नवीन युवा पिढीसमोर ठेवणार आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा शनिवारी (दि.21) झाला. यावेळी पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यातले गड किल्ले हे शिवत्रपतींच्या शौर्याच्या इतिहासाचे प्रतिक आहे. अनेक संघर्ष यासाठी झाले. त्यांच्या संघर्षाचा अभिमान आम्हाला आहे. त्या किल्ल्यांमध्ये आता हॉटेल, बार सुरू करण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतांना आर.आर. आबांनी डान्सबार बंद केले होते. यांनी सत्ता आल्यानंतर ते पुन्हा सुरू केले. ते कमी की काय म्हणून आता किल्ल्यांमध्येही ‘बार’ सुरू करणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत माझे नाव घेऊन टीका करतात. झोपेतही ते हेच बडबडत असतील. स्वतः त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नाही, असा सांगत आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली जाईल, त्यासाठी ‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा, असेही ते म्हणाले.Post a Comment

Previous Post Next Post