साताऱ्यात स्वाभिमानावरून पवारांनी उदयनराजेंना डिवचले



एएमसी मिरर : वेब न्यूज
माजी खासदार उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साता-यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत उदयनराजे यांना स्वाभिमानावरून पुन्हा डिवचले. ते म्हणाले, “पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा,” असे आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला.
शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपात दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पवार रविवारी साताऱ्यात होते. शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शरसंधान करताना पवार म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केले. आणि आता…?,” असे म्हणत उदयनराजे यांनी टोला लगावला.
“मला जयंतरावांनी यामध्ये भूमिका घेण्यास सांगितले. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा, असे म्हणत पवारांनी उदयनराजे यांच्या टोला लगावला. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा,” असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

Post a Comment

Previous Post Next Post