राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळेंचा पदासह पक्षाचाही राजीनामा


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, मला आणि सामान्य नगरकरांना प्रतिक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे, असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
समाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात व्हिजन असलेल्यांना नेतृत्व दिले जावे, यासाठी पक्षात कायम आग्रह धरत होतो. परंतु दुर्देवाने मागील अप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला. कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आत्ता देखील त्यांनी सर्व पक्षांचे उंबरठे झिजवले. स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली, असा टोलाही त्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला आहे.
पक्षाचे नेते अजितदादा, सुप्रियाताई यांनी देखील व्यक्तीश: लक्ष घालून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नेतृत्व आणि माझ्याकडे असलेल्या टोकाच्या वैचारिक तफावतीमुळे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे मला कधीच शक्य नाही. त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असून, आज मी माझ्या पदाचा तसेच सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील राजकीय घोषणा लवकरच करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post