नगर राष्ट्रवादीत धूसफूस सुरुच; कळमकर-जगतापांमध्ये 'सेटलमेंट'चा आरोप


एएमसी मिरर : नगर
आमदार संग्राम जगताप आणि दोन्ही कळमकर यांच्यामध्ये बंद खोलीत झालेल्या सेटलमेंटमध्ये माझा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. त्यात माझा काडीमात्रही संबंध नाही. मी पुन्हा 'कोतवाली'मध्ये पोहोचलो त्यावेळी कळमकर यांच्या गाडीतून दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, आ. संग्राम जगताप एकत्र बाहेर पडत होते. सेटलमेंट झाल्यामुळेच फिर्याद तयार असून देखील स्वतः कळमकर यांनी फिर्याद दिली नाही आणि माझी देखील देऊ दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यानंतर दोन गटात धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा घालण्यात आला होता. मात्र या प्रकारानंतर अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये धूसफूस सुरुच आहे. रविवारी सकाळी अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर आता किरण काळे यांनीही पत्रकार परिषद घेत जगताप व कळमकर यांच्यावर निशाना साधला आहे.
किरण काळे म्हणाले की,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. हा मेळावा पार पडल्यानंतर पवार साहेब निघून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी मोठा अनुचित प्रकार घडला. यातील एक प्रसंग माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या समवेत घडला. तर दुसरा प्रसंग शरद पवार व्यासपीठावरून उतरून गाडीकडे जात असताना मीही त्या दिशेने चाललो होतो, त्यावेळी माझ्या समवेत घडला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी मला गराडा घातला. धक्काबुक्की सुरू केली. त्याठिकाणी त्यांनी चहूबाजूंनी मला घेरून धक्काबुक्की केल्यामुळे आणि सदर गुंड कार्यकर्ते उंच असल्यामुळे माझा श्वास त्यामध्ये गुदमरला. सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करून त्यातून मी कशीबशी वाट काढत पटकन बाहेर पडत श्वास घेतला. हा प्रकार नेहमीचाच झालेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी नंदनवन लॉन्समधून बाहेर पडत असताना माजी महापौर अभिषेक कळमकर आणि आमदार जगताप यांच्या गुंड कार्यकर्त्यांची त्याठिकाणी हमरीतुमरी सुरू होती. सदर गुंडांनी कळमकर यांना चहुबाजूने घेरत त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. यावरच न थांबता त्यांनी कळमकर यांना चपलांनी मारहाण केली. हा प्रकार पाहिल्यानंतर मी गाडीतून उतरून अभिषेक कळमकर यांच्या मदतीला धावून गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अरेरावी करणाऱ्या गुंड कार्यकर्त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यानंतर एका वाहनांमध्ये बसवून आम्हाला सभा स्थळापासून दूर नेले. या घटनेनंतर मी व अभिषेक कळमकर पोलिसांच्या समवेत घडलेल्या प्रकाराची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो. त्याठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने जमले होते. तसेच माझे व कळमकर यांचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जमले होते. कोतवाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
सुरुवातीला अभिषेक कळमकर यांनी त्यांच्या समवेत घडलेल्या प्रसंगाची फिर्याद दिली. त्यानंतर मी माझ्या समवेत घडलेल्या प्रसंगाची स्वतंत्र फिर्याद दिली. दोन्ही फिर्यादीच्या प्रिंट देखील घेण्यात आल्या. या प्रक्रीयेदरम्यान जेष्ठ नेते दादा कळमकर हे कोतवाली पोलिस ठाण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते हेही दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही कळमकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आमदार संग्राम जगताप हे स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांनी बंद दाराआड दोन्ही कळमकरांशी चर्चा केली. मी देखील सुरुवातीला त्या खोलीमध्ये उपस्थित होतो. परंतु सदर चर्चा आणि वाटाघाटी या जगताप आणि कळमकर यांच्यामध्ये सुरू असल्याने आणि मला स्वतःला यामध्ये काडीमात्रही रस नसल्याने मी खोली मधून तात्काळ बाहेर निघून आलो. काही वेळानंतर मला आत बोलाविल्याचा निरोप आला. मी पुन्हा आत मध्ये गेलो आणि याबाबत आपल्याला काही चर्चा करायची नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर परत आमदार संग्राम जगताप यांनी अभिषेक कळमकर यांना वेगळ्या खोलीमध्ये येऊन चर्चा करण्याबाबत आग्रह धरला. मला देखील त्यांनी त्यासाठी सोबत घेतले. त्यांची आपापसात चर्चा सुरु झाल्यानंतर मी पुन्हा त्या ठिकाणाहून तात्काळ बाहेर पडलो. मला माझी फिर्याद नोंदवायची होती. त्याची प्रत देखील मी पोलिसांकडे मागितली होती. त्यांनी देखील ती घेण्यासंदर्भात त्यांच्या कनिष्ठांना सूचना केली. मात्र, एवढे मोठे नेते आल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे फिर्याद देण्यासाठीची परिस्थिती त्या ठिकाणी राहिली नाही. शेवटी वैतागून मी कोतवाली पोलिस स्टेशन मधून बाहेर पडलो.
आमदार जगताप आणि दोन्ही कळमकर यांच्यामध्ये बंद खोलीत झालेल्या सेटलमेंटमध्ये माझा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. त्यात माझा काडीमात्रही संबंध नाही. बराच काळ लोटल्यानंतर ही सगळी नेतेमंडळी 'कोतवाली'मधून निघून गेली असावीत म्हणून मी पुन्हा कोतवाली मध्ये पोहोचलो. आतमध्ये आलो असता त्याच वेळेला कळमकर यांच्या गाडीतून दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, आ. संग्राम जगताप एकत्र बाहेर पडत होते. त्यांनी मला पाहिल्यानंतर जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसण्याचा आग्रह धरला. मी आपल्या समवेत येऊ शकत नाही याची त्यांना कल्पना दिली. परंतु तरी देखील त्यांनी आग्रह धरला. पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या त्यांना नाही म्हणत असताना देखील त्यांनी मला गाडीमध्ये बसवले.
त्यानंतर कळमकर यांच्या निवास्थानी आम्ही सर्वजण गेलो. तिथे गेल्यानंतर कळमकर आणि आमदार संग्राम जगताप त्यांच्यामध्ये परत बंद खोली चर्चा सुरू झाली. कोतवाली मध्येच या नेते मंडळींमध्ये सेटलमेंट झाली होती. ही सेटलमेंट कशा प्रकारची झाली, त्याच्याविषयी आपल्याला कल्पना नाही. परंतु सेटलमेंट झाल्या मुळेच त्याठिकाणी फिर्याद तयार असून देखील स्वतः कळमकर यांनी देखील दिली नाही आणि माझी देखील देऊ दिली नाही. कळमकर यांच्या निवासस्थानी देखील यांची बैठक सुरू असताना मी त्या बैठकीमध्ये अजिबात सहभागी झालो नाही. तिथे पोहोचताच मी तात्काळ त्याचे निवासस्थान सोडले आणि तिथून बाहेर पडलो, असा खुलासा काळे यांनी केला आहे.
घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय स्वरूपाचा होता. शहराचा प्रथम नागरिक राहिलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करणे निंदनीय तर आहेच. परंतु अशा घटनेतून सोयीस्कररित्या माघार घेणे हे देखील अयोग्य आहे.
आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांच्या दहशतीचा मी स्वतः यापूर्वी अनेक वेळेला अनुभव घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी ज्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील शहर जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आले तेव्हा आमदार अरुण जगताप आणि माझ्या मध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी देखील असाच प्रकार त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी माझ्यावर केला होता, असेही किरण काळे यांनी म्हटले आहे.

जगताप आणि कळमकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू
काल घडलेल्या प्रकारानंतर कळमकर यांनी सुरुवातीला घेतलेली आक्रमक भूमिका आणि नंतर सेटलमेंट करून करून त्यावर टाकलेला पडदा याचे मला फारसे आश्चर्य वाटत नाही. जगताप आणि कळमकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अहमदनगर शहराला माहिती आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून महानगरपालिकेची निवडणूक असेल, त्यावेळी आणि इतर वेळेला मी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. मी पक्षाशी कायम प्रामाणिक राहिलो आहे, असा दावा काळे यांनी केला आहे.

उमेदवारीचा दावेदार असल्यानेच मला जगतापांकडून टार्गेट केले जाते
मी नगर शहरातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून प्रबळ दावेदार आहे. तसेच पक्षाकडे मुलाखत देखील दिली आहे. अभिषेक कळमकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे मी वर्तमानपत्रांतून वाचतो. परंतु आजतागायत त्यांनी कधीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही. तसा अर्ज पक्षाकडे केलेला नाही आणि मुलाखतीही दिलेली नाही. त्यामुळे जगताप यांच्याबरोबर मी एकमेव दावेदार आहे. त्यामुळेच जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मला कायमच टार्गेट केले जाते. देशात आणि पक्षात लोकशाही आहे. जगताप यांची गुंड प्रवृत्ती पाहता, त्यांची पक्षाशी असणारी निष्ठा पाहता, त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेमध्ये स्वतःच्या नगर शहर मतदारसंघामध्ये देखील त्यांना मोठ्या मताधिक्क्याने नगरकर मतदारांनी नाकारण्याची स्थिती पाहता त्यांना पक्षाने तिकीट देऊ नये, असे आपण यापूर्वीच पक्षाच्या व्यासपीठावर सांगितलेले आहे.
मी उच्चशिक्षित आहे, तरुण आहे, शहराच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे, त्याच बरोबर अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीला लोकांशी नगर शहराच्या विकासासाठी दोन हात करण्याची माझी ताकद आहे. या सर्व बाबींचा विचार करता पक्ष माझ्या मागणीचा विचार जरूर करेल, असा मला विश्वास आहे. यावेळेला काही झाले तरी या निवडणुकीच्या निकालामध्ये माझी भूमिका निर्णायक असेल, असा दावाही किरण काळे यांनी केला आहे.

कोतवाली पोलिस प्रशासन आमदार जगताप यांच्या दबावाखाली
माझ्यावरती काल घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला आज सकाळी सोशल मीडियातून समजली. वास्तविक पाहता सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे आणि ते पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध आहे. ज्यावेळी तिथे कळमकर आणि जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार सुरू होता, त्यावेळी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. वादाच्या शेवटी नंदनवन लॉन्सच्या सर्वात बाहेरच्या कमानीजवळ मी माझ्या गाडीतून चाललो होतो, त्यावेळी मी हा प्रकार पाहिला आणि गाडीतून खाली उतरत अभिषेक कळमकर यांना मदत करण्यासाठी धावत गेलो. कळमकर यांनी स्वतः फिर्याद देण्या पासून घुमजाव केले नसते आणि फिर्याद दिली असती तर कदाचित आपण योग्य ती मदत केली याचे मला समाधान वाटले असते. परंतु त्यांनी स्वतः घुमजाव केल्यामुळे आपण यांना मदत केल्याचा आता मला पश्चाताप होत आहे. माझ्यावर घडलेला प्रसंग हा त्या ठिकाणचा नसून स्टेजच्या जवळचा होता आणि माझी त्यासंदर्भातील स्वतंत्र फिर्याद होती. असताना देखील आमदार संग्राम जगताप यांच्या या दबावाला बळी पडून कोतवाली पोलिस स्टेशनच्या प्रशासनाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे यासंदर्भामध्ये अर्ज करून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करणार आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून 'दूध का दूध पानी का पानी' होईल. ज्यांनी मारले आणि ज्यांनी चपलांचा मार खाल्ला, हेही त्यामध्ये दिसून येईल. सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी कुठेही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post