एएमसी मिरर : वेब न्यूज
पुणे शहर, उपनगरासह शहरालगतच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री ढगफुटी झाल्याने शहरासह उपनगरात महापूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यात शहर आणि जिल्ह्यात एकूण 18 जणांचा बळी गेला आहे तर 10 जण बेपत्ता झाले आहेत. त्यात शहरात 12 मृत तर 5 बेपत्ता आहेत. जिल्ह्यात खेड-शिवापूरमध्ये 6 जण वाहून गेले. त्यातील 4 मृतदेह हाती आले आहेत.
पुरंदर तालुक्यात 1 मृत तर दोघे बेपत्ता आहेत. बारामती तालुक्यात एक जण बेपत्ता आहे. पुणे शहरातील आंबिल ओढा व कात्रज तलावाने ढगफुटीनंतर रौद्र रूप धारण केले. अवघ्या दोन तासांत धो-धो 180 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने शहर व उपनगरांतील अनेक सोसायट्या, वसाहती आणि घरांमध्ये पाणी शिरले. सोसायट्यांमध्ये वेगाने शिरलेल्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले व अनेक वाहने दूरवर वाहून गेली.
शहरासह जिल्ह्यात 832 जनावरे दगावली आहेत. शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी रात्री या पावसाने रौद्र रूप धारण केले. कात्रज घाटातून आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाने मिळेल त्या मार्गाने शहरात घुसखोरी केली. अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत रात्री दीडच्या सुमारास सोसायटीची भिंत कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कात्रज परिसरात कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला तर धायरीत कामावरून दुचाकीवर परतत असलेली एक परिचारिका वाहून गेली. तर जिल्ह्यात खेड-शिवापूर येथील दर्गा परिसरात झोपलेले पाच जण पाण्यात वाहून गेले.
पुणे शहरात बुधवारी रात्री साडेनऊनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. अवघ्या काही तासांतच अनेक भागात पाणी साचून रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. टांगेवाले कॉलनीत भिंत कोसळल्याची माहिती मिळताच तत्काळ एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात करत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. टांगेवाले कॉलनी ही येथील आंबिल ओढ्याला लागून आहे. रात्री अचानक मुसळधार कोसळल्याने ओढ्याला पूर आला. त्यानंतर हे पाणी कॉलनीतील काही भागात शिरले. त्यामुळे नागरिकांना गंगातीर्थ सोसायटीजवळ हलवण्यात येत होते. दरम्यान, याच वेळी पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीची भिंत कोसळली.
या दुर्घटनेत इतरही काही नागरिक पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या जलतांडवामुळे कात्रज, कोंढवा, वानवडी, इंद्रायणीनगर, सिंहगडरस्ता, बिबवेवाडी, आंबिल ओढा कॉलनी, कोथरूड, पद्मावती, मित्रमंडळ कॉलनी, आंबेगाव बुद्रुक परिसर, धायरी फाटा, सातारा रस्ता, वारजे माळवाडी परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
Post a Comment