'वंचित'चा अकोल्याबाहेर एकही आमदार निवडून येणार नाही : आठवले


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, या मताशी मी सहमत नसून अकोल्यामध्ये त्यांचे एक-दोन आमदार निवडून येतात, पण बाहेर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही. त्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता होईल असे शक्य नसल्याचे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ‘महायुती’तले भाजपचे सहयोगी रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला चांगली मतं मिळाली तरी या विधानसभेला ते चित्र काही पाहायला मिळणार नाही. नेतेच नाही तर खालच्या पातळीवर बरेचसे कार्यकर्ते त्यांच्याकडे वळले होते तेही आता आमच्या पक्षात परत आले असल्याचे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास आठवले म्हणाले. आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने  (आठवले गट) महायुतीमध्ये किमान १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
मी चंद्रकांत पाटील यांना २३ जागांची यादी दिलेली आहे आणि त्यापैकी १० जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. पण जोपर्यंत भाजप-शिवसेनेच्या जागांचे वाटप होत नाहीत  तोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही. त्यामुळे आमची भाजप-सेनेला सूचना अशी आहे की, लवकरात लवकर आपला वाद मिटवावा, त्यांच्यामध्ये एकमत करावे आणि मित्रपक्षांना ज्या १८ जागा सोडायच्या आहेत ते ठरवावे, असे आठवले म्हणाले.
यावेळेस ‘आरपीआय’ चे पाच-सहा  तरी आमदार निवडून आणूच, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आम्हाला निवडून येणारेच मतदारसंघ द्यावेत, पडणारे देऊ नयेत. जे मतदारसंघ दिले जातील तिथे दोन्ही पक्षांची मतं आम्हाला मिळाली पाहिजेत, अशी मागणीही आठवले यांनी या मुलाखतीत केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post