आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होतील : रोहित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ द्या, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कुटुंबातील गृहकलहामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका. आमचं कुटुंब एकत्र असून पवारसाहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यावरूनच आता रोहित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
‘पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ द्या, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका. आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया,’ असं आवाहन कार्यकर्त्यांना करत रोहित पवारांनी टीकाकारांना इशाराही दिला आहे.
‘माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा. सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post