ईडी कार्यालयात जाऊन ‘पाहुणचार’ स्वीकारणार : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे, त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (27 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा पाहुणचार स्वीकारणार आहे, असाही टोला त्यांनी लगावला. 
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पूर्ण विश्‍वास आहे असेही ते म्हणाले. मी राज्य सहकारी बँकेचा कधीही संचालक वा सदस्य नव्हतो, मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे. त्यामुळे ईडीला माझी गरज लागली, तर मी एकदम अदृष्य झालो, असं वाटू नये, म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही
महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. या राज्यावर त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, असेही पवार यांनी ठणकावले. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. 1980 मध्ये अमरावतीमध्ये एका शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात मला अटक करण्यात आलेली होती. मात्र माझ्या बाजुने निकाल लागला व प्रश्‍न शिल्लक राहिला नाही, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post