विधानसभा लढविण्यासाठी शिवसेनेच्या मनसेला शुभेच्छा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात प्रचार केला होता. पण यावेळी मनसेने दुसऱ्यांचा अपप्रचार न करता स्वतःचा प्रचार करावा, असं म्हणत शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी निवडणुकीसाठी मनसे शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगड इथे नुकत्याच विभाग अध्यक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा अहवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर मनसे निवडक १०० जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यासाठी राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेशही दिले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यासाठी राज ठाकरेंच्या या निर्णयाला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसे आघाडीसोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी शक्यता आहे. त्यामुळे मनसेने दुसऱ्यांचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यापेक्षा मनसेने स्वतः साठी प्रचार करून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावं, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठींबा देत भाजपविरोधात प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील विविध विभागातील जागांची चाचपणी या आधीच राज ठाकरे यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली या मतदारसंघात मनसेचे इच्छुक उमेदवार अधिक आहेत. तसेच या भागात मनसेचं वर्चस्व आहे. मात्र नेमक्या किती जागा कुठे लढवणार याची अधिकृत घोषणा राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post