एएमसी मिरर : वेब न्यूज
“येणार तर युतीचंच सरकार येणार”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप -शिवसेना युतीवर भाष्य केले .
“राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले . यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं. “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू? गेली अनेक वर्षे ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करून दाखवल्या आहेत” असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० चा उल्लेख केला.
काश्मीर अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार आणि हे नरेंद्र मोदींनी सिद्ध करून दाखवलं असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच आमच्यामध्ये ताकद आहे. त्या ताकदीचा सदुपयोग करणारा आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता आम्हाला सापडला आहे. देशाच्या अस्मितेचे विषय आपण सक्षमतेने हाताळत आहात. मोदींच्या रूपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळालं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Post a Comment